कोल्हापूर : हमिदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या कामगारांना १० टक्के इतकी वेतनवाढ व इतर सेवा शर्ती लागू करण्यात आली आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार संजय मंडलिक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाचा फायदा तब्बल कारखान्यातील सुमारे ६५० कामगारांना होणार आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या निर्णयाची माहिती देताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले की, शासन नियुक्त त्रिपक्षीय समितीच्या शिफारशीनुसार कारखान्याने प्रक्रिया केली आहे. कामगारांना मिळणारी वेतनवाढ ही मूळ पगार, महागाई भत्ता व स्थिर भत्ता अशा मिळणाऱ्या एकूण पगारावर लागू होईल. सदासाखर कामगार संघटनेने याबाबतची मागणी केली होती. त्याला संचालक मंडळाच्या सभेमध्ये मान्यता दिली. यावेळी उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, प्रकाश पाटील, विश्वासराव कुराडे, सत्यजित पाटील, प्रदीप चव्हाण, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.


















