कोल्हापूर : श्री दत्त कारखान्याकडून ११.७८ लाख टन ऊस गाळप, १०० टक्के ऊस बिले अदा

कोल्हापूर : येथील श्री दत्त साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ११.७८ लाख टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली आहे. कारखान्या नियोजनबद्ध कामकाज करत कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. केंद्र सरकारच्या एफआरपी धोरणानुसार कारखान्यास प्रतिटन ३,३७८ रुपये देय होते. मात्र, शेतकरी हित केंद्रस्थानी ठेऊन व्यवस्थापनाने ३,४५० रुपये देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार उसाची शंभर टक्के बिले आता शेतकऱ्यांना मिळाली आहेत, अशी माहिती उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील व संचालक उपस्थित होते.

गणपतराव पाटील म्हणाले की, कारखाना शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हावी, यासाठी कारखाना विविध ऊस विकास योजना राबवत आहे. ज्या क्षेत्रांनी या उपक्रमात सहभाग घेतला, त्यांची एकरी उत्पादकता सर्वोत्कृष्ट ठरली आहे. कारखान्याने यंदाच्या हंगामात प्रतिटन ३,४५० रुपये दराने एकूण ४०६ कोटी ६५ लाख ३२ हजार रुपयांचे वितरण पूर्ण केले आहे. कारखान्याने आपली विश्वासार्हता जपत, चालू हंगामात गाळप झालेल्या उसाची संपूर्ण बिले एकरकमी आणि विनाकपात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. आगामी हंगामासाठी कारखान्याने उसाची नोंद करावी. यावेळी उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक अनिलराव यादव, दरगू गावडे, प्रमोद पाटील, शेखर पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here