कोल्हापूर : राज्यात यंदा चांगल्या पावसामुळे आगामी गळीत हंगामासाठी पुणे, पुरंदर, बारामती, इंदापूरसह दक्षिण महाराष्ट्रातून ‘८६०३२’ वाणाला मागणी वाढली आहे. मात्र वातावरणामुळे रोपे पूर्ण विकसित होत नसल्याची स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यात सततचे ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारी पावसाची रिपरिप आणि तापमानातील चढ- उतार यामुळे रोपवाटिकांमधील वातावरण दमट झाले आहे. त्यामुळे ऊस बियाणे आणि कोकोपीट सतत ओलसर राहत असल्याने बुरशीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. ‘८६०३२’ या ऊस वाणाच्या रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रोपांची उगवण प्रक्रियाच धोक्यात आली आहे. दरम्यान, यामुळे शेतकरी पर्यायी वाणांकडे वळत आहे. १५००६, १५०१२, १३००७, एसएनके १३३७४ आणि १८१२१ यांसारख्या जाती चांगल्या वाढत आहेत. त्यांची उगवण क्षमता टिकून असल्याने या वाणांना पसंती मिळत आहे.
बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपवाटिका चालकांसह शेतकऱ्यांचीही कोंडी झाली आहे. पुढील गळीत हंगामावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रोपवाटिकेत एका ट्रेमध्ये साधारणपणे ७० बियाणे लावली जातात, मात्र सध्याच्या परिस्थितीत केवळ ३० ते ४० रोपेच उगवत असल्याचे चित्र आहे. उगवण क्षमता थेट ६० टक्क्यांपर्यंत खालावली आहे. रोपांच्या तुटवड्यामुळे रोपांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरात प्रतिरोप दरात ५० पैशांनी वाढ होऊन तो दोन रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागणी कायम राहिल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. रोपवाटिकांमधून मर्यादीत रोप पुरवठ्याचा परिणाम केवळ चालू हंगामावरच नव्हे, तर पुढील गळीत हंगामाच्या उत्पादनावरही होण्याची भीती आहे.