कोल्हापूर : हुपरी (ता. हातकणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व हुपरी पोलीस ठाणे यांच्या वतीने सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झाले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजिंक्य डुबल यांनी मार्गदर्शन करताना बैलगाडी, अंगद ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांच्या पुढच्या व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. वाहनांमध्ये क्षमतेएवढाच ऊस भरावा, ऊस वाहतूक करताना मोबाईलचा वापर करू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये, रिकामे वाहन बेदरकारपणे चालवू नये, तसेच ऊस वाहतूक वाहनात टेपरेकॉर्डर व स्टेरिओचा वापर करू नये, आपल्या वाहनांची आरटीओ कागदपत्रे, वाहनाचा विमा व वाहनचालकाचा परवाना अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे यांनी आपल्या मनोगतात वाहनाची, रस्ता सुरक्षा अभियान तसेच ट्रॉली पिन व टर्न टेबल इत्यादीची नियमित देखभाल ठेवावी, जेणेकरून आपल्या वाहनातील बिघाडामुळे अपघात होणार नाहीत. तसेच हुपरी गावातून ऊस वाहतूक करताना बायपास रस्त्याचा वापर करावा, आदी विषयांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास हुपरीच्या पोलीस उपनिरीक्षक माया वायकर, ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब गोटखिंडे, जनरल मॅनेजर टेक्निकल विकास कवडे, भास्कर पट्टणकुडे, जयपाल गिरीबुवा, भूषण कोले, अनिल वलशेट्टी, सुदेश मेंच, संजय वासमकर, कैवल्य शास्त्री, तसेच ऊस वाहतूक वाहन मालक व चालक उपस्थित होते. प्रास्ताविक जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे यांनी, सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले. आभार सुपरवाझर सुदर्शन जंगले यांनी मानले.

















