कोल्हापूर : साखर व्यापाऱ्याची कर्जाच्या बहाण्याने ६१ लाखांची फसवणूक, पुण्याच्या दांपत्यावर गुन्हा

कोल्हापूर : कोरोना काळात तोटा झाल्याने व्यवसाय वाढीसाठी राष्ट्रीयिकृत बँकेतून १५ ते २० कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून शाहूपुरीतील एका साखर व्यापाऱ्याला ६१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनीष नानासाहेब देशमुख व संगीता मनीष देशमुख (दोघे रा. गोल्डन कॅस्टल, बालेवाडी, पुणे) या दांपत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित दांपत्याने यापूर्वी संबंधित व्यापाऱ्याच्या भावाची ६५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. महिन्याभरापूर्वी न्यायालयात दाखल गुन्ह्याचा तपास शाहूपुरी पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांत एकूण एक कोटी २६ लाखांची सख्ख्या भावांची फसवणूक या दांपत्याने केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, शाहूपुरीतील असेंब्ली रोडवर फर्म असलेल्या साखर व्यापाऱ्याने १५ ते २० कोटी रुपयांच्या कर्जासाठी २०२० मध्ये प्रयत्न केले. मित्र शंकर पाटील यांच्या ओळखीतून त्याची मनीष देशमुख याच्याशी ओळख झाली होती. सप्टेंबर २०२० मध्ये कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून मनीष देशमुख व संगीता यांनी एका कंपनीच्या नावे दोन लाख रुपये घेतले. कागदपत्रे पाठवल्यानंतर तीन महिन्यांत आणखी ३५ लाख रुपये मागवून घेतले. कर्ज मंजूर झाल्याचे सांगत प्रोसेसिंग फी, बँकेतील अधिकाऱ्यांना पैसे देण्याच्या नावे ६१ लाख रुपये उकळले. तीन वर्षे पाठपुरावा करूनही कर्ज मिळत नसल्याने साखर व्यापाऱ्याने तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here