कोल्हापूर : वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये चालू गळीत हंगामात गेल्या ८६ दिवसांत २ लाख ६१ मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्याने आतापर्यंत एकूण ३ लाख ५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या हंगामात कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे गाळप सुरू असून सध्या येत असलेल्या उसाचे गाळप सुरळीत सुरू आहे. कारखान्याने चालू हंगामातील ३१ डिसेंबरअखेरची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी दिली.
अध्यक्ष देसाई यांनी सांगितले की, कारखान्याने १६ ते ३१ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या ४९,५८८ मे. टन ऊस बिलापोटी ३,४०० रुपयांप्रमाणे विनाकपात १७ कोटी ८६ लाख रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत. कारखान्याकडे उपलब्ध बीड व स्थानिक तोडणी वाहतूक यंत्रणेमार्फत प्राधान्याने करार झालेल्या कार्यक्षेत्रातील व बाहेरील उसाची उचल केली जात आहे. जिल्हा बँकेच्या सहकार्याने उसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जात आहेत. ऊस गाळपाचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे, अशा ठिकाणी यंत्रणा दिली जातआहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता व्यवस्थापनास सहकार्य करावे. यावेळी उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक वसंतराव धुरे, विष्णू केसरकर, उदय पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारुती घोरपडे आदी उपस्थित होते.

















