कोल्हापूर : इको सेन्सिटिव्ह झोनमुळे गवसे येथील वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्याला उपपदार्थ निर्मितीबाबत अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती कारखान्याच्या शिष्टमंडळाने माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे केली. याबाबत माहिती घेऊन विषय मार्गी लावू, अशी ग्वाही पवार यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजरा साखर कारखान्याचे कार्यस्थळ असलेल्या गवसे व दर्डेवाडी ही गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतात. त्यामुळे कारखान्यास उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारण्यात अडचणी येत आहेत.
आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी पवार यांच्यासमोर ही समस्या मांडली. त्यामुळे ही गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळावीत, यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. यावर पवार यांनी याबाबत माहिती घेऊन केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्रसिंग यांची पुढील आठवड्यात दिल्लीत भेट घेऊन विषय मार्गी लावू. त्यासाठी कारखान्याचे शिष्टमंडळास दिल्लीस या अशी सूचना त्यांनी केली. आमदार जयंत पाटील, संचालक उदयसिंह पवार, संचालक अशोक तर्डेकर, दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई आदी यावेळी उपस्थित होते.