कोल्हापूर : जिल्ह्यात दरवर्षीचा महापूर, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती तसेच वाढलेला उसाचा उत्पादन खर्च, महागाई यामुळे ऊस शेती तोट्यात आहे. उसाचा उत्पादन खर्च निघत नाही. दरवर्षी शेतकरी ऊस दर वाढवून मिळावा, यासाठी मागणी करीत आहेत. आता नवीन हंगा सुरू होण्यापूर्वी उसाचा दर जाहीर करूनच साखर कारखाने सुरू करावेत. अन्यथा ऊस वाहतूक अडवण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. शासनाच्या २०१३ च्या अधिनियमानुसार, कारखान्यांना झालेल्या नफ्यातील वाटा, ७०-३० फॉर्म्युल्याप्रमाणे नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्याला दुसऱ्या हप्त्याच्या रूपाने द्यावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह साखर सहसंचालक आणि पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाढलेल्या महागाईने शेतकऱ्याला ऊस शेती परवडत नाही. या उलट दोन वर्षांत कारखान्यांना साखर, बगॅस, मोलॅसिस, मळीला चांगला भाव मिळाला आहे. त्यामुळे कारखान्यांना झालेल्या नफ्यातील वाटा ७०- ३० फॉर्म्युल्याप्रमाणे, दुसऱ्या हप्त्याच्या रूपाने द्यावा. महिन्यापूर्वीच संघटनांनी दराबाबत सर्व कारखान्यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. या मागणीला धुडकावून आज मागील हप्ता आणि चालूचा दर घोषित न करता कारखाने सुरू करत आहेत. प्रशासनाने कारखानदार आणि शेतकरी संघटना यांचा संघर्ष थांबवावा. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, महादेव काळे, भगवान कोइगडे, मंगेश नलावडे उपस्थित होते.












