कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे सहा हजार महिला करताहेत ऊस तोडणीचे काम

कोल्हापूर : जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. यंदाच्या गळीत हंगामात मराठवाड्यातील बीड, परळी, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आदी जिल्ह्यांतून एकूण १८३० ऊस तोडणीच्या टोळ्या आल्या आहेत. यामध्ये १४ हजार ३४ मजूर ऊस तोडणी, भरणीचे काम करीत आहेत. या ऊस तोडणी टोळ्यांतील मजूर पत्नी, मुलांसह पालाची झोपडी मारून संसार थाटला आहे. अनेक मजूर कारखाना कार्यस्थळावर आणि उसाच्या फडातच राहिले आहेत. दिवसभर ऊस तोडणी, भरणीचे काम ते करत आहेत. यामध्ये ५ हजार ९४९ महिला मजुरांचाही समावेश आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ८२ गर्भवती महिलाही ऊस तोडणीचे काम करीत आहेत.

जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुरांच्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला असता असे दिसते की एकूण १८३० मजूर टोळ्या कार्यरत आहेत. यामध्ये ८०९५ पुरुष मजुरांचा समावेश आहे. तर ५९४९ महिला मजुरांचा समावेश आहे. याशिवाय या मजुरांसोबत पाच वर्षाखालील ५५९ मुले आणि ४९८ मुली आहेत. आरोग्य विभागाने या मजुरांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे नियोजन केले आहे. महिला, मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, म्हणून शासनाचे आरोग्य विभाग कारखानानिहाय आरोग्य शिबिर आयोजित करून त्याची आरोग्य तपासणी करीत आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य तपासणीत १८५९ मजुरांना ताप असल्याचे समोर आले. यामध्ये १५८१ पुरुष आणि ८३१ महिलांचा समावेश आहे. अंगात ताप असतानाही ते ऊस तोडणी, भरणीचे काम करीत आहेत. महिला मजूर ऊस तोडणी, भरणीसह स्वयंपाक करतात. त्या अविश्रांत काम करीत असल्याने त्याची प्रकृती खालावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here