कोल्हापूर : कामगारांच्या वादासह इतर अनेक अडचणी असतानाही केवळ शेतकरी व तोडणी-ओढणी वाहतूकदार यांच्या विनंतीवरून दौलत कारखाना सुरू केला होता. पण मंगळवारी कामगारांनाच काहींनी धमकावून त्यांना अडविले. त्यामुळे मी हतबल झालो असून सर्वांची माफी मागून कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागत असल्याची भावना ‘अथर्व’चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केली. हलकर्णी येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून कामगार-अथर्व प्रशासनात वाद सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यासमोर झालेल्या बैठकींमध्ये ११ पैकी ९ मागण्या मान्य केल्या. राहिलेल्या दोन मागण्यांवर पुढे विचार करू, असे सांगितले. त्यानंतरही कामगार कामावर आले नाहीत. नंतर इतर कामगार, तोडणी वाहतूकदार व शेतकऱ्यांच्या मदतीने कारखाना सुरू केला; पण कामगार नेते उदय नारकर यांच्या सूचनेवरून मंगळवारी काहींनी कामावर येणाऱ्या कामगारांनाही धमकावून अडविले. त्यामुळे यातून वाद वाढविण्यापेक्षा कारखानाच बंद ठेवलेला बरा, या विचाराने हा कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष खोराटे यांनी सांगितले. कॉ. उदय नारकर यांनीच येणाऱ्या कामगारांना अडवून मारा, आपली दहशत तयार करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.












