कोल्हापूर : अथर्व इंटरट्रेड – दौलत साखर कारखान्याकडून गणेशोत्सवापूर्वी थकीत बिनव्याजी मूळ एफआरपी तत्काळ मिळावी, अशी मागणी मांडेदुर्ग, कोवाड, तांबूळवाडी, नांदवडे येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे निवेदनातून केली आहे. स्वार्थापोटी काही लोक व्याजासह थकीत एफआरपी मिळावी असा आग्रह धरत आहेत. मात्र, हा आग्रह चुकीचा आहे. आम्हाला केवळ थकीत एफआरपी मिळावी आणि कारखाना बंद पडू नये यासाठी तहसीलदारांनी लक्ष घालावे, असे आवाहन या शेतकऱ्यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ज्यांचा एक टनही ऊस कारखान्याला जात नाही, अशा लोकांनी जनतेची दिशाभूल करून दौलत-अथर्वकडून व्याजासह रक्कम मागितली आहे. मात्र, हेच लोक आठ वर्षे कारखाना बंद होता तेव्हा कुठे गेले होते? कारखाना आता सुरळीत झाला आहे. योग्य नियोजनामुळे थकीत रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. काही लोकांच्या हट्टापायी सर्व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. कारखाना देखील सुस्थितीत चालला पाहिजे. त्यामुळे यात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी. विनाकारण अथर्व आणि शेतकऱ्यांमध्ये दरी निर्माण करणाऱ्यांना तुम्ही बोलावून ताकीद द्यावी, अन्यथा याविरोधात आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.