कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याने ऊस दराच्या पहिली ३,६५२ रु. प्रतिटन उचल देऊन राज्यात पहिला सन्मान मिळविला असताना, कारखान्याने ४६ दिवसांमध्ये दोन लाख टन ऊसगाळप आता टप्पाही पूर्ण केला आहे. यापैकी वीस हजार टन उसाचे सात कोटी रुपये अदाही केले आहेत. त्यामुळे ‘भोगावती’च्या धर्मकाट्यासह आर्थिक नियोजनावरील विश्वासावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अलीकडच्या दहा, पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये ‘भोगावती’कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. परंतु, दिवंगत आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, जनता दलाचे वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सतेचा झेंडा फडकविला. यानंतर मात्र कारखान्याच्या आर्थिक कारभारास प्रशासकीय कामामध्ये लक्ष घातले. जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ए. वाय. पाटील, क्रांतिसिंह पवार यांनी वेळोवेळी लक्ष घालून कारभारामध्ये सुधारणा करून घेत विश्वासार्हता निर्माण केली.
कारखान्याकडे ५३९७.५४० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. यापैकी गाळप हंगाम सुरू केलेल्या ४६ दिवसांमध्ये १५८९.१८० हेक्टरमधील दोन लाख टन ऊस गाळप करत अपेक्षित टप्पा पूर्ण केला आहे. राज्यात विक्रमी ऊस बिलाची पहिली उचल देण्यात बाजी मारणाऱ्या ‘भोगावती’चे साडेसहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. प्रामुख्याने एकेकाळी साखर उत्पादन, उताऱ्यासह अन्य प्रशंसनीय कामासाठी बक्षिसांची लयलूट करणाऱ्या ‘भोगावती’ला अवकळा आली होती; पण पुन्हा विश्वासार्हता निमर्माण करत व लागलेला डाग पुसून काढत ‘भोगावती’ने यशाची घौडदौड सुरू आहे.

















