कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. हंगामाच्या समाप्तीनिमित्त संचालक संभाजीराव पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा आयोजित केली होती. व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई म्हणाले, सभासदांनी दाखविलेला विश्वास आणि संबंधित सर्वच घटकांनी दिलेल्या सहकार्यामुळे बिद्री कारखाना आर्थिक सक्षम आहे. अध्यक्ष, माजी आमदार के.पी. पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान उंचावत ठेवण्यासाठी व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यकारी संचालक एस.एन. घोरपडे म्हणाले, यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने १०२ दिवसांमध्ये ७ लाख ७४ हजार ७४० मे. टन उसाचे गाळप केले. १२.६२६ टक्के साखर उताऱ्याने ९ लाख २१ हजार २५० साखर पोती उत्पादित केली आहेत. संचालक सुनीलराज सूर्यवंशी, आर. व्ही. पाटील, फिरोजखान पाटील, फत्तेसिंग भोसले, दीपक किल्लेदार, राजेंद्र भाटळे, आर. एस. कांबळे, रावसो खिलारी, राजेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


















