कोल्हापूर : दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यंदा १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याच्या परंपरेनुसार आगामी हंगामात ऊस उत्पादकांना उच्चांकी ऊस दर दिला जाईल, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामासाठीच्या रोलर पूजनप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पाटील यांच्या हस्ते रोलरचे पूजन झाले. यावेळी गळीत हंगामाच्या मशिनरी जोडणीस प्रारंभ करण्यात आला. यंदा कारखाना कार्यक्षेत्रात १२ लाख टनांवर ऊस उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष के. पी. पाटील यांनी सांगितले की, साखर कारखान्याने २०२४-२५च्या गळीत हंगामात सरासरी १२.७१ टक्के साखर उतारा मिळविला. कारखान्याने आजअखेर ३३७० रुपये ऊसदर उत्पादकांना दिला आहेत. उसाला प्रतिटन ३२०० रुपये पहिला हप्ता दिला असून, १७० रुपये महिन्यापूर्वी दिले आहेत. हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार सुरू आहेत. यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह सर्व खातेप्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.