कोल्हापूर : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील १६ ते ३० नोव्हेंबर या पंधरवड्यातील प्रतिटन ३४०० रुपयांप्रमाणे उसबिले जमा केली. प्रतिटन १०० रुपये गळीत हंगाम संपल्यानंतर दिले जाणार आहेत. एक ते १५ नोव्हेंबर या पंधरवड्यातील तोडणी वाहतूक बिलेही आदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, ३४०० रुपये पहिला हप्ता आणि उर्वरित १०० रुपये हंगाम संपल्यानंतर असे प्रतिटन ३५०० रुपये दिले जाणार आहेत. १६ ते ३० नोव्हेंबर या काळात ९६ हजार ५४९ टन उसाचे गाळप झाले. गुरुवार (ता. ११) पासून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर मिळणार आहेत. कारखान्याने या हंगामात आजपर्यंत दोन लाख ५६ हजार ५२५ टन ऊस गाळप केले असून, सरासरी ११.१८ टक्के साखर उताऱ्याने दोन लाख २९ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. आजअखेर दोन लाख चार हजार ८१० टनांची उसबिले अदा केली आहेत. या हंगामात दोन कोटी १८ लाख युनिट वीजनिर्मिती करून एक कोटी ४८ लाख युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे. कारखान्याने सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष मुश्रीफ यांनी केले आहे.

















