कोल्हापूर : शाहूनगर-परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक धीरज डोंगळे व प्रा. सुनील खराडे या दोघांमध्ये वाद झाला. बैठकीत एका कामगाराच्या बदली प्रकरणावरून वादावादी झाली. काही संचालकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणातून हा वाद चिघळला. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी, संचालक मंडळाच्या बैठकीसाठी संबंधित दोन्ही संचालक उपस्थित होते. एका कामगाराच्या बदलीवरून दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला. जोरजोरात वादावादी सुरू झाल्याने आम्ही हा वाद सभागृहातच मिटविला, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कारखान्याच्या शेजारील गावांमधील संचालकांचे समर्थक तातडीने कारखान्यात आले. त्यांच्यामध्येही गोंधळ उडाला. समर्थकांतही वादाने गोंधळात भर पडली.
बैठकीतील वादाबाबत संचालक सुनील खराडे यांनी सांगितले की, कौलव येथील पाणीपुरवठा संस्थेतील कामगार हा कारखान्यात स्लिप बॉय म्हणून काम करतो. त्याच्या बदलीबाबत संचालक बैठकीत चर्चा सुरू असताना धीरज डोंगळे यांनी, त्याची बदली करू नका, असे सांगून दहशत माजविणारे शब्द वापरले. आपल्या कार्यकर्त्यांना चुकीचा संदेश देऊन बोलावून त्यांनी घेऊन गोंधळ घातला. मला मारहाण केल्याचे चुकीचे वृत्त पसरवले असा दावा खराडे यांनी केला. दरम्यान, संचालक धीरज डोंगळे यांनी आजच्या घटनेबाबत मी उद्या पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया देणार आहे. आजच्या घटनेसंदर्भात मी आज काहीही बोलू शकत नाही असे सांगितले.
















