कोल्हापूर : सलग पडणाऱ्या पावसामुळे ढगाळ हवामान आणि ओलाव्यामुळे उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. बहुतांश ऊस पट्ट्यात मे महिन्यापासूनच पावसाचा जोर कायम आहे. यंदाचा हंगाम अवघ्या एक ते दीड महिन्यावर आला आहे. शिवारांना आवश्यक असा वाफसा मिळालेला नाही. ऊस उत्पादक तांबेरा, पोक्का बोंग, मावा, करपा आदींसह अन्य रोग किडीने उसाला पोखरण्यास सुरुवात केल्याने दुहेरी संकटात सापडले आहेत. पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भ आणि मराठवाडा या भागांतही कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असल्याने हंगामाच्या सुरुवातीपासूनच उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या स्थितीचा थेट परिणाम उत्पादनावर होऊ शकतो, असा इशारा ऊस तज्ज्ञांनी दिला आहे.
दुष्काळामुळे मागील वर्षी मोठा फटका बसल्यानंतर यंदा महाराष्ट्राचा ऊस हंगाम चांगला ठरेल असे आडाखे बांधण्यात येत आहेत. मात्र, पावसामुळे ऊस वाढीला बाधा येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी अती पावसाचा फटका बसणार आहे. परिणामी खत व्यवस्थापनासह अन्य शेतीकामे करणे कठीण झाले आहे. उसाला पावसाचा फटका बसण्याच्या शक्यतेला काही कारखान्यांच्या शेती विभागाच्या प्रतिनिधींनी दुजोरा दिला. तर कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक पिसाळ यांनी सांगितले की, सातत्याने ढगाळ हवामान व पाऊस अशा हवामानामुळे अनेक ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळे येत आहेत. यामुळे वाढ अपेक्षित होत नाही. हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे उसाच्या वजनावर प्रतिकूल परिणाम होवू शकतो.