कोल्हापूर : दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लि. युनिट आसुर्ले-पोर्ले साखर कारखान्याकडून सन २०२४-२५ हंगामात गाळप झालेल्या संपूर्ण उसाचा दुसरा हप्ता (रु. १४२) प्रतिटना प्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारी (दि. ९) जमा करण्यात आला. सन २०२४-२५ गाळप हंगामामध्ये कारखान्याने एकूण ९,४१,१९५ टन उसाचे गाळप केले. एकूण साखर उतारा १३.३२ इतका राज्यात उच्चांकी साखर उतारा आहे. त्याप्रमाणे गाळप झालेल्या उसाचा प्रतिटन रु. ३,३०० प्रमाणे पहिला हप्ता यापूर्वीच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
आतापर्यंत एकूण ३,४४२ रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत. कारखान्याकडून प्रतिटन रु. १४२ प्रमाणे गाळप झालेल्या संपूर्ण उसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी एकूण रु. १३ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. उसाचा दुसरा हप्ता मिळाल्यामुळे कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेतीची कामे सुरू असल्यामुळे आणि अगदी योग्य वेळी उसाचा मोबदला मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधन व्यक्त केले आहे.
दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लि. नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करीत असल्यामुळे कारखान्याकडून शेतकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा पुरविल्या जातात, तसेच कारखान्यास शेतकऱ्यांनी पुरविलेल्या उसाचा योग्य व वेळेत मोबदला देण्यास नेहमीच कटिबद्ध असलेचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी सांगितले. येणाऱ्या गाळप हंगाम २०२५-२६ साठी उत्पादित होणारा ऊस शेतकऱ्यांनी दालमिया साखर कारखान्यास पाठवावा, असे आवाहन केले आहे.











