कोल्हापूर : येथील दत्त साखर कारखान्यातर्फे बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेतीबाबत शास्त्रज्ञ व शेती तज्ज्ञांचा मेळावा कारखाना कार्यस्थळावर झाला. या मेळाव्यात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. नीळकंठ मोरे यांनी मार्गदर्शन केले. सध्याच्या परिस्थितीत बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेती केली पाहिजे. कमी खर्चात जास्त उसाचे उत्पादन येण्यासाठी काही प्रयोग करावे लागतील. यासाठी शेतकरी आणि शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी दत्त कारखाना, शास्त्रज्ञांच्या वतीने कृती आराखडा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन डॉ. नीळकंठ मोरे यांनी केले.
डॉ. मोरे म्हणाले की, जे काम कृषी विद्यापीठांमध्ये झाले नाही, ते जमीन क्षारपड मुक्तीचे काम उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या जमिनीत यशस्वी करून दाखवले हे खरोखरच उल्लेखनीय आहे. प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. डॉ. मच्छिंद्र बोखारे, डॉ. के. कन्नन, डॉ. महादेव स्वामी, डॉ. दशरथ थवाळ, डॉ. अजित चौगुले, डॉ. के. व्ही. सुशिर, डॉ. जयवंत जगताप, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, डॉ. अरुण मराठे, डॉ. बाळासाहेब सावंत, डॉ. बी. पी. पाटील, डॉ. विजय नाळे यांनी मार्गदर्शन केले. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, ‘दत्त’चे अध्यक्ष रघुनाथ पाटील, चंद्रशेखर कलगी, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, शरदचंद्र पाठक, महेंद्र बागे, इंद्रजित पाटील, दरगू गावडे, शेखर पाटील, अॅड. प्रमोद पाटील, मंजूर मेस्त्री, प्रदीप बनगे, ए. एस. पाटील उपस्थित होते.