कोल्हापूर : दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यात दरवर्षी ४५ हजार टन प्रेसमड उत्पादित होते. त्यामुळे कारखाना उत्तम प्रतीचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन करू शकतो. राज्य सरकार कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनास चालना देत आहे. त्यानुसार प्रतिदिन सहा टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभारणीस कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सभेत सभासदांनी मंजुरी दिली. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी पत्रिकेवरील विषयाचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषयांना हात उंचावून मंजुरी दिली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी सहकारी कारखानदारी टिकविण्यातच शेतकऱ्यांचे हित आहे असे सांगितले. सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील राहील असेही ते म्हणाले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी ऊस दर देता यावा यासाठी केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत किमान ४२ रुपये प्रतिकिलो करावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, कारखान्याचा गेल्या वर्षीचा हंगाम ९८ दिवस चालला. सरासरी साखर उतारा १२. २९ टक्क्याने होऊन ११ लाख ६० हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. उसास ३२०० रुपयांप्रमाणे एफआरपीची रक्कम दिली आहे. यावेळी उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, अनिलराव यादव, दरगू गावडे, प्रमोद पाटील, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, अस्मिता पाटील, संगीता पाटील, बाबासो पाटील, अमर यादव, निजामसो पाटील, विश्वनाथ माने, ज्योतिकुमार पाटील, सिद्धगौंडा पाटील, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, गतवर्षीच्या उसाला दुसरा हप्ता द्यावा अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली.