कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामासाठी एकरकमी प्रतिटन ३४०० रुपये विनाकपात देणार आहोत. तसेच हंगाम समाप्तीनंतर जी रिकव्हरी येईल त्याप्रमाणे शासन धोरणाप्रमाणे रक्कम द्यावी लागल्यास तीही कारखाना सत्वर देईल. हंगामात कारखान्याने १५ लाख टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून सभासदांनी ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
येथील श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या २०२५-२०२६ च्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते काटापूजन केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील म्हणाले, देशातील विविध ठिकाणी असलेल्या दराच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यातील उसाचे दर हे सर्वात जास्त आहेत. केंद्र शासनाने एफआरपी रकमेमध्ये प्रतीवर्षी वाढ केली आहे. परंतू एमएसपी दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे सर्व साखर कारखानदारांना उसाची एफआरपी रक्कम देणे अत्यंत जिकीरीचे होत आहे.
गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. केंद्र शासनाने प्रतीवर्षी जाहीर केलेली एफआरपी रक्कम एकरकमी अदा केली आहे. सभासदांचे एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी आमच्या कारखान्याने ठिकठिकाणी मेळावे घेवून सभासदांना मार्गदर्शन केले आहे. आज जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढवणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यासाठी आम्ही ऊस विकासाच्या विविध योजना राबवून शास्त्रज्ञांच्यामार्फत सातत्याने सभासदांना मार्गदर्शन केले आहे. सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल. कारखान्याने सभासद केंद्रस्थानी मानून कारखाना व्यवस्थापनाचे कामकाज चालू आहे. गळीत हंगामासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे.’
कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, संचालिका विनया घोरपडे, संचालक बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, बसगोंडा पाटील, अॅड. प्रमोद पाटील, अमर यादव, दरगू गोपाळ माने-गावडे, संचालिका संगिता पाटील कोथळीकर, अस्मिता पाटील, कामगार संचालक प्रदिप बनगे आदी उपस्थित होते. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा यांनी आभार मानले.


