कोल्हापूर : दौलत कारखाना चालवायला घेताना या कारखान्याचा सुवर्णकाळ परत आणणार असा शब्द दिला होता. त्याची सुरुवात झाली आहे. कारखान्याला जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त करण्यात यश आले आहे. तासगावकर शुगर्सच्या काळातील शिल्लक एफआरपी येत्या महिनाभरात देणार आहे, अशी माहिती ‘अथर्व’चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. हलकर्णी (ता. चंदगड) येथे आज कारखाना कार्यस्थळावर मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
नवीन बॉयलर उभारणार कारखान्याचा बॉयलर जुना झाला आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करून नवीन बॉयलर उभारणार असल्याचे खोराटे यांनी सांगितले. त्यामुळे हलकर्णी गावासह परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोपाळराव पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष संजय पाटील, संग्रामसिंह कुपेकर, संतोष मळवीकर प्रमुख उपस्थित होते. संजय पाटील, शुभांगी पाटील व मान्यवरांच्या हस्ते रोलर पूजन केले. खोराटे म्हणाले, ‘शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून अथर्व-दौलतचे काम सुरू आहे. शेतकरी, कामगार व तोडणी-ओढणीवाहतूकदारांचे सहकार्य आहे. करारानुसार जिल्हा बँकेच्या कर्जातून कारखाना कर्ज मुक्त केला आहे. यापुढील काळात टप्प्याटप्प्याने सर्वच देणी देणार आहे.’ गोपाळ पाटील, मधुकर सावंत आदी उपस्थित होते. अश्रू लाड यांनी प्रास्ताविक केले.