कोल्हापूर : ऊस उत्पादनवाढीसाठी एआय तंत्रज्ञान वापरल्यास जिल्हा बँक देणार जादा पिक कर्ज

कोल्हापूर : ऊस उत्पादनवाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञान वापरल्यास हेक्टरी साडेदहा हजार रुपये जादा पिककर्ज देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. बँकेच्या या धोरणांमुळे शेतकऱ्यांना मूळ पीककर्ज मर्यादेपेक्षा हे जादा पैसे मिळणार आहेत. यापूर्वी बँकेने ऊस लागवडीसाठी प्रतिहेक्टरी मंजूर कर्जमर्यादा ठरवली आहे. आता कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासाठी बँकेने दोन कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी याआधीच जाहीर केली होती.

ए.आय.च्या कृषी क्षेत्रातील वापरामुळे ऊस पीक उत्पादन वाढते, असा तज्ज्ञांचा अहवाल आहे. या उत्पादन वाढीसाठी सॅटेलाइट सपोर्ट, मोईश्चर सेन्सर, वेदर स्टेशनचा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये वाढ तर होतेच. तसेच वीजवापर, पाणी, खते, कीटकनाशके आदी खर्चामध्ये ३० टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे. जिल्हा बँकेच्यावतीने आडसाली लागवडीसाठी दीड लाख रुपये, सुरू लागवडीसाठी दीड लाख रुपये व खोडवा पिकासाठी सव्वालाख रुपये असा कर्जपुरवठा होत होता. यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञान वापरासाठी या प्रचलित कर्ज मर्यादेवर हेक्टरी साडेदहा हजार रुपये जादा कर्ज मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे सूक्ष्म सिंचन म्हणजेच ‘ड्रिप इरिगेशन’ सुविधा आहे आणि आवश्यक भांडवली गुंतवणूक साखर कारखाना किंवा अन्य संस्थेमार्फत असणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here