कोल्हापूर : दौलत सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या प्रश्नावर गेल्या महिन्यात आंदोलन करण्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कारखान्याचे व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांची बैठक घेतली. यावेळी कामगारांचे वेतन, वेतनवाढ, सेवेत कायम करणे याबाबत चर्चा झाली. वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी कामगारांच्या वकिलांनी केली. त्याला व्यवस्थापनाच्या वकिलांनी विरोध केला. कारखान्याला वेतन आयोग लागू होत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. कामगारांच्या वकिलांनी याबाबतचा शासन निर्णयाचा दाखला दिला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबच्या त्रिपक्षीय करारासंदर्भात साखर आयुक्तांकडून मार्गदर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केले. विजय देवणे आणि उदय नारकर यांनी कामगारांचे नेतृत्व केले.
दौलत कारखान्याचे व्यवस्थापन आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. कामगारांचा बोनस विषयीसुद्धा चर्चा झाली. साखर आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर स्टाफिंग पॅटर्नचा निर्णय घेऊन १०२ कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत व्यवस्थापन निर्णय घेईल. कामगारांचे पगार १० तारखेच्या आत करणे, कामगार संघटनांशी चर्चा करून बोनसचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतली. तर वेतन आयोगाबाबत जोपर्यंत स्पष्ट निर्णय होत नाही, तोपर्यंत कामगार शिफ्टमध्ये काम करणार नाहीत. ते केवळ दिवसाच काम करतील, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. त्यामुळे साखर आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसारच पुढील प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट झाले.












