कोल्हापूर : कोल्हापूर म्हटले की गुळाची बाजारपेठ अशी ओळख आहे. जिल्ह्यात १०० हून अधिक गुऱ्हाळघरे आहेत. पावसाने उघडीप दिल्याने गूळ हंगामाने गती घेतली असून, जिल्ह्यातील ९०हून अधिक गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत. सद्यस्थितीत गुजरात बाजारपेठेत गुळाची मागणी वाढली असल्याने दर वाढले आहेत. गेले वर्षभर साखरेला तेजी आहे. घाऊक बाजारात ३००० रुपये, तर किरकोळ बाजारात ४४०० रुपये क्विंटलपर्यंत दर राहिला आहे. त्यात्याचा परिणाम गुळाच्या दरावरही झाला आहे. घाऊक बाजारात दिवाळीपूर्वीच दर पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. कोल्हापूर बाजार समितीत दररोज सरासरी ३० किलोचे १२ हजार रखे, तर एक किलोचे ११,५०० बॉक्सची आवक होत आहे. गुजरात बाजारपेठेत गुळाला मागणी असल्याने येथे प्रतिक्विंटल ५००० रुपयांपर्यंत दर आहे.
यंदा, सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे गुऱ्हाळघरे सुरू करण्यात अडथळे आले होते. मात्र, यंदा अखंड पावसाळ्यात नऊ गुन्हाळघरे सुरू राहिल्याने गुळाची आवक बाजार समितीत नियमित सुरू होती. आता, गेल्या आठ- दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे रव्यांची आवक वाढली आहे. गेल्यावर्षी एप्रिल ते ११ ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूर बाजार समितीत ६,२५,१९६ क्विंटलची आवक झाली होती. यावर्षी आतापर्यंत ८,०२,५८१ क्विंटल आवक झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत १.७७ लाख क्विंटलने आवक वाढली आहे. सध्या एक किलोच्या रव्यालाच अधिक पसंती मिळत आहे.