कोल्हापूर : युद्धामुळे जिल्ह्यातील गूळ निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका

कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळघरे आणि गूळ बाजारपेठांमधून दरवर्षी देशातील विविध राज्यांमध्ये तसेच परदेशात मोठ्या प्रमाणात गूळ निर्यात केला जातो. श्रीलंका, बांगलादेश तसेच आशियातील काही बाजारपेठांसह विशेषतः मध्यपूर्वेतील काही देशात कोल्हापुरी गुळाला चांगली मागणी असते. कोल्हापुरातून थेट निर्यात फारशी होत नसली तरी काही व्यापारी चांगल्या प्रतीचा गूळ मुंबईच्या व्यापाऱ्यांना पाठवतात. तेथून तो गूळ निर्यातदारांकडून परदेशात पाठवला जातो. मात्र, सध्या इस्राईल-अमेरिका व इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम जिल्ह्यातील गूळ व्यापारावर दिसू लागला आहे. ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वाहतुकीच्या अडचणीमुळे परदेशात होणारी गुळाची निर्यात थांबली आहे.

युद्धाच्या वाढत्या झळा निर्यातीला बसल्या आहेत. गुळाबरोबर अन्य शेतमाल बंदरावर पडून असल्याने समुद्र मार्गाने निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक, जहाजमार्ग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाल्याने व्यापारी मोठा धोका पत्करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. जहाज वाहतुकीच्या मार्गांतील धोका, विमा खर्च वाढणे, पेमेंट व्यवहारांमधील अनिश्चिततेमुळे व्यापारी निर्यात व्यवहार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे गुळाच्या निर्यातीमध्ये मोठी घट झाली आहे. परिणामी व्यापारी आता देशांतर्गत बाजारपेठांकडे वळताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here