कोल्हापूर : आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याचा चौदावा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार, पत्नी जयश्री कुंभार आणि निनाई देवीचे युनिट हेड संजीव देसाई यांच्या शुभहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. विधिवत पूजा घालून गव्हाणी आणि काटा पूजन करण्यात आले.
अतिपाऊस आणि वातावरणातील बदलाचा ऊस पिकांच्या पोषक वाढीवर परिणाम झाल्याने यंदाचा हंगाम साखर कारखानदारीसाठी आव्हानात्मक आहे. दालमिया प्रशासनाने शेतकऱ्यांबाबत नेहमी सकारात्मक निर्णय घेतले आहे. यावर्षी बारा लाख टनांच्या उद्दिष्टपूर्ततेतीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्व ऊस दालमिया कारखान्याला पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन यूनिट हेड संतोष कुंभार यांनी गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी केले.
कारखान्यास प्रथम ऊस बैलगाडी घेऊन येणारे कंत्राटदार गणपती चौगुले, गाडीवान सरदार काशीद (पोर्ले) व ट्रॅक्टरमालक कृष्णात तोडकर (पडळ) यांचा सत्कार करण्यात आला. गत हंगामात कारखान्यास जास्तीचा ऊस पुरवठा करणारे शेतकरी उपेंद्र तासे (पोर्ले), तुकाराम पाटील (यवलुज), चंद्रकांत चौगुले (कोतोली), सागर किडगावकर (निगवे) यांचा, तर वाहतूक कंत्राटदार सरदार पाटील प्रियांका दरेकर, सागर गायकवाड (माळवाडी) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.











