कोल्हापूर : जिल्ह्यात मक्का उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू, इथेनॉलमुळे वाढतोय दर

कोल्हापूर : देशात इथेनॉल निर्मितीसाठी मका ‘गेमचेंजर’ ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष मका पिकावर केंद्रीत झाले आहे. जिल्ह्यातही मका उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्याचा विचार केला, तर मक्याचे क्षेत्र १८६ हेक्टर असून, उत्पादकता ५२१ टन आहे. हे क्षेत्र कमी असून ते वाढविण्यासाठी केंद्र, राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत मक्याचा ३० ते ५० टक्के वापर इथेनॉलमध्ये वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी मका लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे मका बाजारात पुन्हा झळाळी येण्याची चिन्हे आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धुळे येथे प्रत्येकवर्षी ५०० एकर क्षेत्रांत मका पिकाच्या रब्बी, खरीप हंगामात ‘ट्रायल’ घेतल्या जातात. सध्या जिल्ह्यातील शेतकरी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत, विविध संशोधित वाणांचा वापर करत हळूहळू मका पिकाकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. कसबा बावड्यातील मका संशोधन प्रकल्पातर्फे संशोधन प्रकल्प सुरू आहे. जास्त उत्पादन देणाऱ्या, अन्नद्रव्यास चांगला प्रतिसाद देणाऱ्या,जैविक- अजैविक घटकास अनुकूल असणाऱ्या संयुक्त अन् संकरित वाणांची निर्मिती केली जाते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन यासाठी जागरुकता मोहीम सुरू आहे अशी माहिती मका कृषी विद्यावेत्ता डॉ. सुहास भिंगारदेवे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here