कोल्हापूर : वारणा साखर कारखाना गळीत हंगाम संपल्यानंतरच्या काळात धान्यापासून इथेनॉल उत्पादन करण्याचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करेल अशी घोषणा, कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी ऊस उत्पादक सभासदांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. या सभेत जादा ऊस पुरवठा करणाऱ्या गावांचा आणि शेतकऱ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. जादा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना बुलेट आणि स्प्लेंडर मोटारसायकली देऊन गौरविण्यात आले. कारखान्याच्या मालकीच्या जत ( जि. सांगली) येथील १०० एकर जागेवर २१ मेगावॉट क्षमतेच्या वीज प्रकल्पाचे काम दहा दिवसांत प्रत्यक्ष सुरू होईल. हा प्रकल्प कारखान्यास ऊसपुरवठा करणाऱ्या सहकारी पाणीपुरवठा संस्थाना सुरुवातीस अल्पदरात व तीन वर्षांनी मोफत वीज पुरवेल असे, कोरे यांनी जाहीर केले.
सभेत बुलेट गाडीचे भाग्यवंत विजेते शेतकरी संतोष उचगावकर (आरळे), भूषण पाटील (जुने पारगाव), अमोल पाटील (भेंडवडे), राजेंद्र पाटील (लाडेगाव), प्रशांत पाटील (करंजवडे) आणि स्प्लेंडरचे विजेते आनंदराव गवळी (कोडोली), कृष्णात माने (अंबप), शिवराज पाटील (लाटवडे), मानसिंग पाटील (तांदुळवाडी), भास्करराव भोसले (चिकुर्डे) यांचा सत्कार करण्यात आला. हंगामात संपूर्ण ऊस पुरवठा करणाऱ्या गावांचा सत्कार आमदार कोरे यांच्या हस्ते सत्कार झाला. सचिव बी. बी. देशिंगे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांनी विषय वाचन केले. वारणा विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी तज्ज्ञ संचालक एन. एच. पाटील यांची व पश्चिम महाराष्ट्र सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल डॉ. प्रताप पाटील, व्हीएसआय पुणेचा ऊस भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी बाळासाहेब पाटील (पारगाव), शिवाजी देवकर (कुरळप ) यांचा सत्कार झाला. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, एन. एच. पाटील, उत्तम पाटील, सर्व संचालक, सभासद उपस्थित होते. प्रा. एन. आर. चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.