कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात उसाच्या घटत्या उत्पन्नांमुळे शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका

कोल्हापूर : सततचा पाऊस, वातावरणातील बदल, रोगराई यामुळे यावर्षी उसाच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते. मात्र, अलीकडच्या काळात खते, बी-बियाणे, औषधे, मजुरी आदींचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असतानाच उसाचे घटते उत्पादन आणि याचा थेट उत्पन्नावर होणारा परिणाम यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. आडसाली उसाच्या क्षेत्रात एकरी सुमारे १ लाख १० हजार, तर खोडवा उसाच्या उत्पन्नात सुमारे ४५ हजारांच्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. उत्पादनाबरोबर उत्पन्नही घटल्याने शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली आहे.

दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, शिरोळ तालुक्यात दरवर्षी उसाच्या उत्पादनात होणारी घट शेतकरी आणि साखर कारखानदारीसाठी चिंता निर्माण करणारा विषय ठरला आहे. दरवर्षी महापुराच्या भीतीने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ऊस बियाण्यांसाठी विक्री केला जात आहे. तालुक्यात चार नद्यांनी शेती समृद्ध बनली आहे. मात्र, याच नद्या पावसाळ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणाऱ्या ठरत आहेत.

महापुराच्या धास्तीने नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आपला ऊस रोपवाटिकांना विक्री करत आहे. यावर्षी महापुराच्या धोक्याबरोबरच सततचा पाऊस, शेतीतील ओलावा, ढगाळ वातावरण, रोगराईचा फटका ऊस शेतीला बसला आहे. सध्या ऊस हंगाम जोमात सुरू आहे. मात्र, उसाचे उत्पादन घटल्याने याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अडसली ऊस क्षेत्रात एकरी सर्वसाधारणपणे ८० टन उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, हे उत्पादन निम्म्यावर म्हणजे ४० टनावर आले आहे, तर खोडवा उसाच्या क्षेत्रात एकरी ४५ ते ५० टन उत्पादन अपेक्षित होते, तिथे केवळ २५ ते ३० टन उत्पादन निघत आहे.

यावर्षीही ऊस शेती तोट्यात जाणार…

आडसाली उसाला एकरी सव्वालाख, तर खोडवा उसाला एकरी सुमारे ४५ हजारांच्या नुकसानीचा फटका बसणार आहे. उत्पादनाचा वाढता खर्च आणि घटणारे उत्पन्न यामुळे ऊस शेती शेतकऱ्यांना संकटात नेणारी ठरत आहे. एकरी जवळपास सव्वा लाख रुपये, तर खोडवा उसाचे एकरी सरासरी ४० हजार रुपयांच्या नुकसानीचा फटका बसत आहे. यावर्षी अनेक संकटांमुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here