कोल्हापूर : पूर्वी ऊस तोडणी म्हटले की, शेतकऱ्याला एक प्रकारचे संकटच वाटत होते. तोडणीसाठी आलेले मजूर मनमानी करत ऊस तोडतात. ऊस जमिनीपासून वरून तोडणे, वाढ्यामध्ये पेरे ठेवणे, लहान तुकडे केलेले ऊस मोळीत न बांधणे आदी कारणांवरून ऊसतोड मजूर आणि शेतकरी यांच्यामध्ये अनेकवेळा वाद घडतात. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस शेतातून बाहेर काढेपर्यंत अगदी मेटाकुटीला येतो. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांपासून हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीमुळे तोडणी प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाले. ऊस तोडणी करणे सोपे झाले आहे. आधुनिक यंत्राद्वारे तोडणी उत्तम होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीही यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणीला पसंती देत आहेत.
आधुनिक मशीनमधील चांगल्या बदलांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मशीनच्या साहाय्याने ऊस तोडणी करण्याची मानसिकता झाली आहे. अनेक गावांत मशीनच्या साहाय्याने ऊस तोडणीला पसंती मिळत आहे. याबाबत ऊस तोडणी मशीन व्यावसायिक महावीर मुरचिटे सांगतात की, मशीनमुळे कमी वेळात, कमी कष्टात ऊस तोडला जातो. त्यामुळे शेतकरी ऊस तोडणीत अडकून पडत नाही. यातून कष्टाची आणि वेळेची बचत होते. शिवाय शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट देखील कमी होतात. ऊस तोडणीवेळी पाला शेतातच पडत असल्याने तो शेतातच पडते. ते कुजण्यास सोपे होते. त्यामुळे सेंद्रिय खत तयार होऊन शेताचा पोत सुधारण्यास मोठी मदत होते.


















