कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अनेक अधिकाऱ्यांकडून पाळीपत्रकाचा केवळ दिखावा केला जातो, अशी तक्रार ऊस उत्पादकांतून केली जात आहे. गळीत हंगामाने वेग पकडला असला तरी ऊस उत्पादक शेतकरी तोडणीसाठी कारखान्यांच्या वाऱ्या करू लागले आहेत. ज्यांनी वर्षानुवर्षे कारखान्यात सभासद म्हणून निष्ठा दाखवली, त्याच सभासदांचा ऊस शिवारात सडत आहे. तर ज्यांच्याकडे राजकीय वजन, कारखान्यांतील वशीला आहे, त्यांच्या शेतातील ऊस तातडीने तोडला जात आहे. तर सामान्य शेतकऱ्यांना रोज नवा त्रास सहन करावा लागत आहे.
साखर कारखान्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी लवकर देऊ अशी आश्वासने दिली जात आहेत. काही ठिकाणी प्रभावी नेता किंवा पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून कारखाना परिसराऐवजी बाहेरील गावातील उसाला ही प्राधान्य दिले जात आहे. व्यवस्थापनाकडे लक्ष देत नाही. तोड यंत्रणा ठरावीक वर्तुळात फिरते. सामान्य ऊस उत्पादकांना शेतात ऊस तोड आणण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे शिष्टाई करावी लागते अशी स्थिती आहे. ऊस तोडणी पाळीपत्रकाची अंमलबजावणी कडकपणे करण्याची मागणी ऊस उत्पादकांकडून होत असली तरी कारखाना व्यवस्थापन दुर्लक्षच करत असल्याचे दिसून येते. व्यवस्थापनांकडून पारदर्शकतेने ऊस तोडणी झाली नाही, तर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता आहे. आडसाल लागण असलेल्या ऊस उत्पादकांकडेही दुर्लक्ष झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगतिले.


















