कोल्हापूर : जवाहर साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नव्याने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता ए. आय. तंत्रज्ञान ऊस क्षेत्रात बसविल्यास त्याद्वारे शेतकऱ्यांना ठराविक ऊस क्षेत्रातील आवश्यक ती माहिती मिळत आहे. त्यासाठी जवाहर साखर कारखान्याने पाच हजार रुपये अर्थ सहाय्य केले आहे. शेतकऱ्यांनी ५,००० रुपये भरायचे आहेत. हे ५,००० रुपये शेतकऱ्यांच्या येणाऱ्या ऊस बिलातून दोन हप्त्यांत घेतले जातील. कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांनी खास उसासाठी विकसित करण्यात आले हे यंत्र आपल्या ऊस क्षेत्रात बसवून घ्यावे, असे आवाहन कारखान्याचे संचालक सुनील नारे यांनी केले.
येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला जवाहरचे ऊस उत्पादक सभासद प्रशांत पाटील, विलास थकार, जयपाल मगदूम, संजय पाटील, श्रीकांत नसलापूरे उपस्थित होते. संचालक नारे म्हणाले की, जवाहर कारखान्याने अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली, आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, राहुल आवाडे, व्यवस्थापकीय संचालक मनोहर जोशी यांच्या प्रयत्नाने डीकेटीई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. हे यंत्र अडीच एकर ऊस क्षेत्रातील ऊस पिकाबद्दल, शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या बाबत पाणी, खते, औषध फवारणी प्रक्रिया, हवामान, रानातील आर्द्रता याविषयी शेतकऱ्यांना दिलेल्या मोबाईल ॲपवर दररोज माहिती पुरविणार आहे. आवश्यकतेनुसार ऊस पिकाची प्रक्रिया झाल्याने उसाच्या उत्पन्नात ४० ते ५० टक्के वाढ होत आहे. दरम्यान, युवा शेतकरी प्रशांत पाटील यांनी संगितले की, शेतकऱ्यांना ए. आय. यंत्र पाणी व खतांची बचत, औषध फवारणी प्रक्रिया, योग्य प्रमाणात माहिती देत आहे. ए. आय. तंत्रज्ञान आपल्या ऊस क्षेत्रात बसविल्यास शेतकऱ्यांना अधिक फायद्याचे ठरेल.












