कोल्हापूर: येथील राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनच्या कार्यालयात छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची मानधनधारक महिला कुस्तीगीर शिवछत्रपती पुरस्कार विजेती सृष्टी भोसले व सुकन्या मिठारी यांनी विविध स्पर्धेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते हा सत्कार झाला. शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक महिला कुस्तीगीरांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेले यश अभिमानास्पद आहे. अशा मेहनती खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून कागलचा क्रीडा क्षेत्रात लौकिक उंचवावा, असे आवाहन घाटगे यांनी केले.
कारखान्याची मानधनधारक असलेल्या सृष्टी भोसले हिने खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तसेच कवठेपिरान व कोरेगाव येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत खुल्या गटात अजिंक्यपद मिळविले. सुकन्या मिठारी हिने सांगली येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक, तर कवठेपिरान येथे सुवर्ण यश संपादन केले. या दोघींची हरियाणा येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यानिमित्त त्यांचा कारखान्याच्यावतीने गौरव करण्यात आला.


















