कोल्हापूर : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील अथणी शुगर्स युनिट उदय साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाला गुरुवारी (दि. १२) सायंकाळी अचानक आग लागली. त्यामध्ये दोन कामगार किरकोळ जखमी झाले. आग लवकर आटोक्यात आल्याने फार मोठे नुकसान झाले नाही.
डिस्टिलरी विभागात वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी स्पार्किंग होऊन आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या बोलावण्यात आल्या व आग आटोक्यात आणण्यात आली. बांबवडेचे मंडल अधिकारी शिवाजी पन्हाळे व महसूल अधिकारी गगन देशमुख यांनी पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती, असे दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे.

















