कोल्हापूर : ऊस तोडणीसाठी मजूर पुरविण्याकरिता २१ लाख ९८ हजार रुपये देऊनही मजूर न पुरविल्याप्रकरणी प्रवीण दिलीप दळवी (रा. सातवे, ता. पन्हाळा) यांनी तीन महिलांसह पाच ऊसतोड मजुरांविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी अनिल चंद्रकांत पवार, हौसा चंद्रकांत पवार, अंजली अनिल पवार (सर्व रा. बोरघर, ता. खेड, जि. रत्नागिरी), मंगल मधु वाघे (रा. नवा रस्ता, ता. पाटण), दिनेश विष्णू कोळी (रा. माण, जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी २०२४-२५ च्या हंगामासाठी ऊस तोडणी करून तो कारखान्यास पाठविण्यासाठी १०० मजूर पुरवितो, असा फिर्यादी दळवी यांच्याबरोबर नोटरी करार केला होता.
पोलिसांनी सांगितले की, साखर कारखान्यास ट्रॅक्टर आणि ट्रॉलीतून ऊसपुरवठा करण्याचा प्रवीण दळवी यांचा व्यवसाय आहे. त्यांनी ऊस पुरवठ्यासाठी अनिल पवार, हौसा पवार, अंजली पवार, मंगल वाघे आणि दिनेश कोळी यांच्याशी नोटरी करार केला. संशयितांनी जुलै २४ ते नोव्हेंबर २५ या काळात दळवी यांच्याकडून आरटीजीएस, एनईएफटी प्रणाली आणि रोख २१ लाख ९८ हजार रुपये घेतले. संशयितांनी कराराप्रमाणे मजूर पुरविले नाहीत किंवा घेतलेले पैसे परतही दिलेले नाहीत. दळवी यांनी विचारणा केली असता संशयितांनी त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून धक्काबुक्की केली. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ट्रॅक्टर मालकांना ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांनी फसविल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.


















