कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुराचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील रोपवाटिकांना बसला आहे. सद्यस्थितीत शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील शेकडो रोपवाटिकांमध्ये उसाची कोट्यवधी रोपे पडून राहिली आहेत. एकाचवेळी मागणी ठप्प झाल्याची स्थिती आहे. दरवर्षी हंगामात एकेक रोपवाटिकाधारक दरवर्षी २० ते २५ लाख रोपे विकतो. मात्र, यंदा मागणी नाही. खत, औषधे, मजूर यावर केलेला खर्चा शक्यता नाही. त्यामुळे हंगाम पूर्णतः वाया जाण्याची भीती आहे. सध्या रोपवाटिकांमध्ये रोपांची वाढ मर्यादेबाहेर गेल्याने त्यांचा उपयोगच संपत आहे. काही ठिकाणी कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून, रोपवाटिकाधारकांना ही रोपे नष्ट करण्याची वेळ येत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील रोपवाटिकांत कोट्यवधी ऊस रोपे पडून आहेत. उसाच्या रोपांना मराठवाडा, परराज्य आणि स्थानिक मागणी एकदम ठप्प आहे. दरवर्षी पावसाच्या अतिरेकामुळे किंवा बाजारातील चढ-उतारांमुळे ऊस रोपवाटिका व्यवसायाला काहीसा फटका बसतो. परंतु, हंगामातील पुढील मागणीमुळे नुकसान भरून निघत असते. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. याबाबत माहिती देताना जांभळी येथील रोपवाटिका चालक प्रल्हाद पवार म्हणाले की, दरवर्षी या काळात रोपवाटिकेत ग्राहकांची रांग लागलेली असते. पण, यंदा पाऊस आणि पुरामुळे फोनसुद्धा वाजत नाहीत. सगळी रोपे पडून आहेत. खर्च मात्र रोज वाढत आहे. मराठवाडा, परराज्य तसेच स्थानिक पातळीवरील मागणी ठप्प झाल्याने ऊस रोपवाटिकाधारक आर्थिक संकटात सापडले आहेत.