कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यातर्फे बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील जुगूळ येथील मल्लिकार्जुन देवस्थानात ऊस पिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी उसाचा एकरी उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी योग्य वाण निवडून स्वतःचा बियाणे प्लॉट निर्माण करावा. त्यात संख्या नियोजन महत्त्वाचे आहे. योग्य वेळी खत देणे अत्यावश्यक आहे. जैविक खताचा वापर करून कमी खर्चात अधिक ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
ऊस पिक चर्चासत्रात कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल हेग्गाणा, माती – पाणी निरीक्षक ए. एस. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पाटील, दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक अमर यादव, इंद्रजित पाटील, ज्योतीकुमार पाटील, उपस्थित होते. श्रीनिवास कुलकर्णी यांनी स्वागत केले. कार्यक्रमास साखर कारखान्याचे अधिकारी अमर चौगुले यांच्यासह जुगूळ, मंगावती, शहापूर, इंगळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.