कोल्हापूर : एफआरपी थकीत ठेवणाऱ्या २९ साखर कारखान्यांची सुनावणी पूर्ण, कारवाईकडे लक्ष

कोल्हापूर: कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांचे हंगाम संपले असून, दोन कोटी नऊ लाख टन ऊस गाळप केले आहे. विभागात फक्त ९ साखर कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी अदा केली असून, २९ साखर कारखान्यांची १०५४ कोटी १९ लाख रुपये इतकी एफआरपी थकीत राहिली आहे. यामुळे प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी विभागातील २९ साखर कारखान्यांना नोटीस बजावली होती. मंगळवारी यावर सुनावणी झाली. कारखान्यांनी थकीत एफआरपी तातडीने देण्याच्या सूचना प्रादेशिक सहसंचालकांनी दिल्या. यानंतर तातडीने काही साखर कारखान्यांनी ऊस बिले दिली आहेत.

विभागातील काही साखर कारखान्यांनी जानेवारीपासून उसाची बिले थकविली आहेत. नियमानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत उसाची बिले देणे अपेक्षित होते, मात्र मोठ्या प्रमाणात एफआरपी थकीत राहिली आहे. साखर सहसंचालक यांनी विभागातील २९ कारखान्यांना थकीत एफआरपीबाबत नोटीस बजावली होती. आज साखर सहसंचालक कार्यालय येथे सुनावणी घेण्यात आली. यावेळी प्रादेशिक सहसंचालक संगीता डोंगरे यांनी तातडीने ऊस बिले अदा करावीत, अशा सूचना दिल्या. ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, त्यांची सुनावणी घेऊन आरआरसी प्रस्तावित करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here