बिद्री : अमेरिका, युरोप, ब्राझील यांसारखे देश इथेनॉलचे उच्च मिश्रण असलेले पेट्रोल वापरतात. काही देशात शंभर टक्के मिश्रण वापरतात. भारत सरकारने अलीकडेच १० टक्के इथेनॉलला परवानगी दिली असून ती २० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. इथेनॉलमुळे साखर उद्योगाला अधिक गती मिळाली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बिद्रीच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. चांगल्या नेतृत्वामुळे कोणत्याही संस्था चांगल्या पद्धतीने चालतात. आणि म्हणूनच राज्यातील उत्कृष्ट पहिल्या पाच कारखान्यांमध्ये बिद्रीच्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा नंबर लागतो, असे ते म्हणाले.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, बिद्री साखर कारखान्यासारख्या चांगल्या संस्थेच्या पाठीशी सभासदांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. शेतीमध्ये नवीन ए. आय. तंत्रज्ञान विकसित झाले असून त्याचा स्वीकार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. बिद्री कारखान्याचे अध्यक्ष, मा. आमदार के. पी. पाटील म्हणाले की, इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला. परंतु सामान्य ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार या कष्टजीवी घटकांमुळे आपण हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ शकलो. या प्रकल्पामुळे सभासदांना चांगले दिवस येणार आहेत. या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, आमदार सतेज पाटील, संजय घाटगे, माजी आमदार बजरंग देसाई, गोकुळचे संचालक युवराज पाटील, शशिकांत पाटील- चुयेकर, प्रा. किसन चौगले, केडीसीसीचे संचालक भैया माने, अंबरिश घाटगे, गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, कामगार प्रतिनिधी शिवाजी केसरकर व राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.