कोल्हापूर: राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन गावे कारखाना कार्यक्षेत्रात समाविष्ट झाल्याने ती सहा गटांत विभागली आहेत, त्या पोटनियम दुरुस्तीचा मंजुरी देण्यात आली. कारखान्याच्या कार्यस्थळावर अध्यक्ष अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेली सभा ४० मिनिटे चालली. माजी आमदार महादेवराव महाडिक, उपाध्यक्ष गोविंदा चौगुले यांच्यासह संचालक उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष अमल महाडिक यांनी शासनाने साखर कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा अशी मागणी केली. दरम्यान, विरोधकांनी सभेत समाधानकारक उत्तर न मिळाल्याची टीका करत समांतर सभा घेत सत्तारूढ गटावर टीकेची झोड उठवली.
आमदार महाडिक म्हणाले की, सरकारने साखरेची एसएमपी ४,३०० रुपये करण्याची गरज आहे. याशिवाय, घरगुती साखरेचा दर वेगळा करावा. उत्पादित साखर बाजारात यायला विलंब होतो. मात्र, शेतकऱ्यांची बिले पंधरा दिवसांत द्यावी लागतात. त्यामुळे कारखाने उपपदार्थ निर्मितीकडे वळले आहेत. त्यासाठी शासनाने कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा. यावेळी कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी अहवाल वाचन केले. केंद्र शासनाने निर्यातीच्या धोरणामध्ये ओजीएलव्दारे साखर निर्यातीस मान्यता द्यावी. राज्य शासनाने सहवीज निर्मितीमधून निर्माण होणारा वीज खरेदीचा दर ४.७५ रु. वरून ६ रु प्रति युनिट पी.पी.ए. असेपर्यंतच्या कालावधीसाठी द्यावा अशी मागणी करण्यात आली. संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले.