कोल्हापूर : गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील गुळ पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गूळ उत्पादनाला मर्यादा आली. मे महिन्याच्या उत्तरार्धात संततधार पावसाने सुरुवात केल्यानंतर गुळाच्या आवकेत तीस ते पस्तीस टक्क्यांनी घट आली आहे. सध्या गुळास क्विंटलला सरासरी ४१०० ते ४३०० रुपये इतका दर मिळत आहे. बाजार समितीत एक दिवसाआड तीन ते चार हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. गुळाची आवक थंडावली असून गुजरातमधूनही मागणी फारशी नाही. त्यामुळे दरही फारसे वाढले नसल्याचे चित्र आहे. सध्या पावसाळ्याची सुरुवात असल्याने दरात कितपत वाढ होईल, या बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
ॲग्रोवनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, व्यापारी सूत्रांनी सांगितले की, मे महिन्याच्या उत्तरार्धातील संततधार पावसामुळे बाजार समितीत गुळाच्या आवकेत घट झाली आहे. मार्चमध्ये मुख्य गूळ हंगाम संपल्यानंतर पावसाळ्यातही काही गुऱ्हाळे सुरू असतात. जूनपर्यंत गुळाची आवक सुरू असते. पाडव्यापासून बाजार समितीत एक दिवसाआड सौदे होत आहेत. एक दिवसाआड सौदे असले तरी मेपर्यंत ४५०० रुपयांपर्यंत दर वधारला होता. गुजरातमधून गुळाची मेच्या मध्यापर्यं चांगली मागणी राहिली. कोल्हापूरबरोबर कर्नाटकातही वर्षभर गूळ तयार होत असल्याने यंदाही शीतगृहासाठी गूळ खरेदी करणे अत्यल्प राहिले. सध्या तरी जेवढी मागणी तेवढाच गूळ खरेदी केला जात असल्याचे गूळ उद्योगातून सांगण्यात आले.