कोल्हापूर : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात १४ लाख ८९ हजार ७२२ टन ऊस गाळप केले. कारखान्याकडे हंगामात १६,४२४ हेक्टर ऊस गाळपासाठी आला. हंगामापूर्वी सततचा पाऊस व अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे ऊस पिकाच्या वजन वाढीवर परिणाम झाला. प्रतिकूल परिस्थितीमुळे उसाच्या वजनात घट झाली. त्यामुळे हेक्टरी सरासरी ९१ टन इतके ऊस उत्पादन मिळाले. मागील हंगामात ९६ टन ऊस उत्पादन होते, अशी माहिती कारखान्याच्यावतीने देण्यात आली. कारखान्याच्या गळीत हंगामाची नुकतीच यशस्वी सांगता झाली.
यावेळी हंगाम समाप्ती प्रीत्यर्थ उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले व त्यांच्या पत्नी सन्मती चौगुले यांच्या हस्ते उत्पादित साखर पोत्यांचे पूजन झाले. यावेळी कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे प्रमुख उपस्थित होते. संस्थापक, अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे चालला. कारखान्याने ऊसतोडणी वाहतुकीसाठी दोन ट्रक, ३११ ट्रॅक्टर, ४५९ ट्रॅक्टर टायरगाडी व २१६ बैलगाडी आणि ६६ ऊसतोडणी यंत्रे कार्यन्वित होती. कारखान्याने खते, बी-बियाणे, तणनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ठिबक सिंचन, क्षारपड जमीन सुधारणा यासाठी १६ कोटी ८ लाख १८ हजार रकमेचे वाटप केले. त्यामध्ये ९६ लाख ५९ हजार इतके अनुदान दिले आहे. त्यामुळे हंगामात सलग ऊस पुरवठा होण्यास मदत होऊन हंगाम यशस्वी झाला असे पत्रकात म्हटले आहे.


















