कोल्हापूर : सध्या तांबेरा, लोकरी मावा व पानावरील ठिपके या रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वत्र झालेल्या दमदार पाऊस व अधूनमधून होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे पिकावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. तांबेराने उसाची वाढ खुंटते. नवीन पानाची निर्मिती होत नाही. असलेली पाने पिवळसर पडून गळून जातात. संततधार पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत नाही, त्यामुळे अन्न निर्मिती प्रक्रिया थांबली जाते, अशीच स्थिती सध्या दिसून येत आहे. त्यामुळे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याकडून तांबेरा व लोकरी मावा नियंत्रणासाठी ड्रोन फवारणीस सुरुवात करण्यात आली.
कारखान्याने तांबेरा व लोकरी मावा नियंत्रणासाठी बुरशीनाशके व कीटकनाशके उपलब्ध करून ड्रोनद्वारे फवारणीचे नियोजन केले आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार ऊस पीक वाढीसाठी गाळप हंगाम २०२४-२५ पासून ड्रोनद्वारे द्रवरूप खते व औषधे फवारणी योजना अत्यंत माफक दरात बिनव्याजी क्रेडिटवर चालू केलेली आहे. शेतकऱ्यांनी शेती सर्कल, गट ऑफिस किंवा शेती स्टाफ यांच्याशी संपर्क साधून ड्रोन फवारणी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक प्रकाश आवाडे आणि आ. राहुल आवाडे यांनी केले आहे.