कोल्हापूर : जवाहर साखर कारखान्याच्यावतीने सभासद शेतकऱ्यांना शेतीची सुधारित पद्धत व शास्त्रोक्त तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी कार्यक्षेत्रात प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि परिसंवादाचे आयोजन केले जाते. याअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या नवीन, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढविण्यासाठीच्या उपक्रमांसाठी कारखान्याच्यावतीने ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे, अशी घोषणा ज्येष्ठ संचालक, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली. कारखान्यात एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढ विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते.
आमदार डॉ. राहुल आवाडे म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून ऊसउत्पादन वाढीसाठी योजनांची कार्यवाही अत्यंत प्रभावीपणे सुरुवातीपासूनच केली जाते. ऊस शेतीतही एआय तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध होण्यासाठी जवाहर साखर कारखान्याने ऊस विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. यावेळी डॉ. ए. डी. कडलगे, प्रगतशील शेतकरी मोहन नवले यांनी सध्याच्या परिस्थितीत एआय तंत्रज्ञान किती आवश्यक आहे, याबाबतचे विश्लेषण केले.