कोल्हापूर : ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने कुरुंदवाड आणि दानोळी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नगरपालिका चौकातून रॅली काढण्यात आली. सर्वपक्षीय आंदोलनातील कार्यकर्ते, शेतकरी शहरातील पालिका चौकात मोठ्या संख्येने जमले. तेथून सन्मित्र चौक, नवबाग रस्ता, शिवतीर्थ, दर्गाह रस्ता, बाजारपेठ, भैरववाडी असा मार्ग काढत रॅली पुन्हा पालिका चौकात आल्यानंतर तिचे निषेध सभेत रूपांतर झाले. व्यापारी व इतर व्यावसायिकांनी शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या मागणी व आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी ‘शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे द्या’, ‘उसाला योग्य दर मिळालाच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांवरील हल्ले थांबवा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिवसेना -ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे, राजू आवळे, अण्णासाहेब चौगुले, अरुण आलासे, अभिजित पवार, सचिन मोहिते, सुनील कुरुंदवाडे, जय कडाळे, सुधाकर औरवाडे, शिवाजीराव रोडे, गोपाळ चव्हाण, सर्जेराव बाबर यांनी ऊसदराच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. दानोळीत छत्रपती शिवाजी महाराज चौक व मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. ऊसदरासाठी अर्जुनवाडमध्ये बंद पाळण्यात आला. चुडमुंगे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला. बंडू उमडाळे, आप्पासाहेब भोसले, राजेंद्र बेले, आप्पासाहेब गावडे, बापूसाहेब जोंग, केरबा प्रधाने, विठोबा कोळेकर, चंद्रकांत आलासे, बाहुबली चौगुले, सर्जेराव बाबर, सुरेश कांबळे आदी संख्येने उपस्थित होते.












