कोल्हापूर : येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने चालू हंगामात दि. १६ ते ३१ डिसेंबर या पंधरवड्यातील ऊस बिले अदा केल्याची माहिती कारखाना अध्यक्ष माजी खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. मंडलिक म्हणाले, गाळपास आलेल्या ७५ हजार १७८ मे. टन उसाची टनास ३,४१० रु. प्रमाणे होणारी ऊस बिलाची २५ कोटी ६३ लाख ६० हजार ६० रु. इतकी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. सर्वांच्या सहकार्यान ९५ दिवसांमध्ये कारखान्याचे ४ लाख ४४ हजार ३८५ मे. टन उसाचे गाळप केले असून ४ लाख ७४ हजार ४२० क्विंटल साखर पोती उत्पादित केली आहेत. सरासरी साखर उतारा १२.२९ टक्के इतका आहे.
ते म्हणाले, सहवीज निर्मिती प्रकल्पातून १ कोटी ५७ लाख ७४ हजार ३०० युनिट वीज निर्यात केली आहे. कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, तोडणी कंत्राटदार, वाहतूकदार कारखान्यातील सर्व अधिकारी कामगार, कर्मचारी यांच्या सहकार्यान हा गाळप हंगाम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्वांचे आभार मंडलिक यांनी मानले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, संचालक वीरेंद्र मंडलिक, शिवाजीराव इंगळे, प्रकाश पाटील, विश्वास कुराडे, कृष्णा शिंदे, तुकाराम ढोले, पुंडलिक पाटील, महेश घाटगे, मंगल तुकान, प्रतिभा पाटील, धनाजी बाचणकर, प्रदीप चव्हाण, नंदिनीदेवी घोरपडे, विष्णू बुवा, नेताजी पाटील, संभाजी मोरे, कार्यलक्षी संचालक सर्जेराव पाटील, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील आदी उपस्थित होते.


















