राधानगरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्यावतीने आगामी दोन वर्षात राधानगरीत ऊस प्रजनन केंद्र उभारण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठाच्या प्राथमिक टप्प्यातील मंजुरीनंतर याबाबतचा प्रकल्प अहवाल आणि प्रस्तावित केंद्राचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य कृषी संशोधन परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. परिषदेच्या मान्यतेनंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी जाईल. या केंद्राच्या स्थापनेमुळे ऊस शेतीला नवी दिशा मिळेल. प्रस्तावित केंद्रासाठी हत्तीमहाल येथील कृषी विभागाकडील जागा निश्चिती करण्यात आली आहे. पाच हेक्टर जमीन मागणीचा प्रस्ताव कृषी विभागाला दिला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून प्रस्तावित केंद्र उभारण्याची योजना लवकरच मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे.
प्रस्तावित केंद्रासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी पहिल्या पाच वर्षांत १८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, यंत्रसामग्री, संरक्षक भिंत आदीचा समावेश आहे. वैशिष्ट्यपूर्ण (युनिक) दर्जाच्या केंद्रात समावेश असलेल्या येथील सध्याच्या केंद्रात भात व ऊस पिकाचेही संशोधन सुरू आहे. केंद्राने ऊस संकरीकरण संचाआधारे प्रचलित जातींच्या संकरातून नवीन जात विकसित करण्यावर केंद्राने भर दिला आहे. नवीन जातींच्या संशोधनावर मर्यादा पडत असल्याने स्वतंत्र ऊस प्रजनन केंद्र स्थापन केले जात आहे. आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रजनन केंद्रानंतर हे राज्यातील दुसरे केंद्र ठरेल.