कोल्हापूर: जिल्ह्यात ऊसदर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या पुढाकाराने सोमवारी (३ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. साखर कारखाना व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक सायंकाळी पाच वाजता होणार आहे. राज्यात यावर्षीचा हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू झाला. राज्याच्या अन्य भागांत हा हंगाम सुरळीत सुरू असताना जिल्ह्यात मात्र स्वाभिमानीसह आंदोलन अंकुश संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे हंगाम विस्कळीत झाला आहे.
‘स्वाभिमानी’ने यावर्षीच्या हंगामात प्रतिटन ३७५१ रुपये विनाकपात पहिल्या उचलीची मागणी केली आहे, त्यासाठी पाच नोव्हेंबरची ‘डेडलाईन’ दिली आहे. ‘आंदोलन अंकुश’ने तर प्रतिटन चार हजार रुपयांची मागणी केली आहे. संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवणे, त्यांची हवा सोडण्याबरोबरच गेल्या दोन दिवसांत वाहनांची पेटवापेटवीही केली आहे.
या आंदोलनांच्या तीव्रतेची दखल घेत प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी आज सर्व कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालकांसह संघटना प्रतिनिधींना सोमवारी (ता. ३) बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होईल. जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांची तोडणी यंत्रणा दाखल झाली आहे. तोडीचे नियोजन देऊन रस्त्याकडेला असलेल्या उसाची तोड सुरू आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि अलीकडे झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांत पाणी आहे. परिणामी काही तालुक्यांत उसाचे वजन घटले आहे, पिकांची वाढही खुंटली आहे.
कर्नाटकचा हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाला असला तरी तिथेही शेतकरी ऊसदरासाठी आंदोलन करत असल्याने हंगामाला गती नाही. परिणामी यावर्षी उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. हाच मुद्दा संघटनांनी शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. टंचाई असल्याने घाबरू नका, ऊस कारखानदार पाहिजे त्या दराला ऊस नेतील, असे आवाहन केले जात आहे. परिणामी पुन्हा हंगाम लांबण्याची भीती असल्याने प्रशासनाने उद्याच बैठक घेतली आहे. या बैठकीकडे कारखानदारांसह ऊस उत्पादकांकडे डोळे लागले आहेत.
३५५० वर तोडगा शक्य ?
‘स्वाभिमानी’ने यावर्षी ३७५१ रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली आहे, तर बहुतांश कारखान्यांनी पहिली उचल विनाकपात प्रतिटन ३४५० रुपये जाहीर केली आहे, पण हा दर शेतकरी संघटनांना मान्य नाही. उद्याच्या बैठकीत प्रतिटन ३५५० वर तोडगा निघण्याची शक्यता आहे. वाढवून मिळणारे प्रतिटन १०० रुपये कधी द्यायचे, हाच कळीचा मुद्दा उद्याच्या बैठकीत असणार आहे.












