कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपीसह जादाची रक्कम मिळावी, यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर संघटनांनी आंदोलन केले होते. यावेळी या मागण्यांबाबत साखर आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली होती. यानुसार आता एफआरपीसह अतिरिक्त रक्कम, काटामारी रोखण्यासाठी व ‘खुशाली’च्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी लुट रोखण्याबाबत धोरणात्मक चर्चा करण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांची पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात बैठक घेतली जाणार आहे.
साखर कारखान्यांकडून होणाऱ्या काटामारीला आळा घालावा, ऊसतोड मजुरांकडून घेतल्या जाणारी ‘खुशाली’ बंद करावी, अशी मागणी जयशिवराय किसान संघटना, अंकुश संघटना, बळीराजा, स्वाभिमानी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेत याबाबतचे पत्र या सर्व संघटनांना देण्यात आले आहे. पूर्व नियोजनानुसार ही बैठक होणार आहे. सरकारच्यावतीने या बैठकीसाठी शिवाजीराव माने, प्रा. जालिंदर पाटील, रूपेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.


















